आरबीआय 2015-16/218
आयडीएमडी.सीडीडी.क्र.939/14.04.050/2015-16
ऑक्टोबर 30, 2015
अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक
सर्व अनुसूचित वाणिज्य बँका (आरआरबी सोडून)
महोदय/महोदया,
सार्वभैाम सुवर्ण रोखे, 2015-16
अधिसूचना एफ क्र. 4(19)- डब्ल्यु अँड एम/2014 दिनांक ऑक्टोबर 30, 2015 रोजीच्या अन्वये भारत सरकारद्वारा, नोव्हेंबर 05, 2015 पासून नोव्हेंबर 20, 2015 पर्यंत सार्वभैाम सुवर्ण रोखे (“हे रोखे”) देण्याचे ठरविण्यात आले आहे. भारत सरकार, कोणतीही पूर्वसूचना दिल्याशिवाय ही योजना, विहित केलेल्या कालावधीपूर्वीही बंद करु शकते. ह्या रोख्यांच्या प्रचालनाच्या अटी व शर्ती पुढीलप्रमाणे असतील.
(1) गुंतवणुकीसाठीची पात्रता
ह्या योजनेखालील रोखे, भारतात रहिवासी असलेल्या, तशी एक व्यक्ती असलेल्या क्षमतेत, किंवा एखाद्या अल्पवयीन मुलाच्या वतीने किंवा अन्य कोणत्याही व्यक्तीबरोबर संयुक्त रितीने धारण करता येतील. भारतात रहिवासी असलेली व्यक्तीची व्याख्या, विदेशी मुद्रा व्यवस्थापन अधिनियम, 1999 च्या कलम 2 (यु) सह वाचित, कलम 2 (व्ही) मध्ये दिली आहे.
(2) सिक्युरिटीचे स्वरुप
हे रोखे, भारत सरकारच्या स्टॉकच्या स्वरुपात, सरकारी प्रतिभूती अधिनियम, 2006 च्या कलम 3 अनुसार दिले जातील. निवेशकांना एक प्रमाणपत्र (फॉर्म सी) दिले जाईल. हे रोखे डि-मॅट स्वरुपात रुपांतरित केले जाण्यास पात्र असतील.
(3) प्रचालनाची तारीख
प्रचालनाची तारीख, नोव्हेंबर 26, 2015 असेल. नोव्हेंबर 05, 2015 ते नोव्हेंबर 20, 2015 पर्यंत निवेशक ह्या रोख्यांसाठी, स्वीकारर्कत्या कार्यालयात अर्ज करु शकतात. हे प्रचालन, भारत सरकारद्वारा नोव्हेंबर 20, 2015 पूर्वीही, पूर्वसूचना देऊन बंद केले जाऊ शकते.
(4) मूल्य (डिनॉमिनेशन)
हस्त रोख्यांचे मूल्य, एक ग्राम सोन्याचे एकक व त्याच्या पटीत असेल. प्रति वित्तीय वर्ष (एप्रिल-मार्च) प्रति व्यक्तीसाठी ह्या रोख्यातील किमान गुंतवणुक 2 ग्राम व कमाल गुंतवणुक 500 ग्राम असेल.
(5) प्रचालन मूल्य
ह्या रोख्यांची किंमत (मूल्य) भारतीय रुपयात असेल व मागील आठवड्यामधील (सोमवार-शुक्रवार), 999 शुध्दतेच्या सोन्याच्या साध्या सरासरी बंद दरावर (इंडिया बुलियन अँड ज्युवेलर्स असोशिएशन (आयबीनेए) ने प्रसिध्द केलेल्या) आधारित असेल.
(6) व्याज
सुरुवातीच्या गुंतवणुकीच्या रकमेवर दरसाल 2.75 टक्के दराने ह्या रोख्यांवर व्याज दिले जाईल. हे व्याज दर सहा महिन्यांनी दिले जाईल आणि शेवटचे व्याज, परिपक्वतेच्या वेळी मुद्दलासह दिले जाईल.
(7) स्वीकारकर्ती कार्यालये
अनुसूचित वाणिज्य बँका (आरआरबी सोडून) व नेमलेली पोस्ट ऑफिसे (अधिसूचित केल्यानुसार) ह्यांना, ह्याबाबतचे अर्ज थेट किंवा एजंटांमार्फत स्वीकारण्यास प्राधिकृत करण्यात आले आहे.
(8) प्रदानाचे पर्याय
ह्यासाठीचे प्रदान, भारतीय रुपयाट, रोखीने किंवा डिमांड ड्राफ्टने किंवा चेकने किंवा इलेक्ट्रॉनिक बँकिंगने स्वीकारले जाईल. चेक किंवा ड्राफ्ट, वरील परिच्छेद 7 मध्ये विहित केलेल्या बँकेच्या/पोस्ट ऑफिसाच्या (स्वीकारकर्ते कार्यालय) नावे आणि अर्ज सादर केला आहे त्या ठिकाणावर देय असा काढण्यात यावा.
(9) विमोचन
(1) हे रोखे प्रचालनाच्या तारखेपासून 8 वर्षे पूर्ण झाल्यावर पुनर्-प्रदान करण्यास योग्य असतील. ह्या रोख्यांचे मुदतपूर्व विमोचन, प्रचालनाच्या तारखेपासून पाचव्या वर्षानंतर, व्याज प्रदान करण्याच्या तारखेस करण्यास परवानगी आहे.
(2) विमोचनाची किंमत ही भारतीय रुपयात असेल आणि ती, आयबीजेएने प्रसिध्द केलेल्या, 999 शुध्दतेच्या सोन्याची, मागील आठवड्यातील (सोमवार-शुक्रवार) साधी सरासरी मूल्य/दरावर आधारित असेल.
(10) पुनर्-प्रदान
स्वीकारर्कत्या कार्यालयाकडून निवेशकाला, परिपक्वतेच्या एक महिना आधी, ह्या रोख्यांच्या परिपक्वतेची तारीख कळविली जाईल.
(11) वैधानिक तरलता गुणोत्तरासाठी (एसएलआर) पात्रता
ह्या रोख्यांमधील गुंतवणुक एसएलआर साठी पात्र असेल.
(12) ह्या रोख्यांविरुध्द कर्ज
हे रोखे कर्जांसाठी तारण म्हणूनही वापरता येऊ शकतात. त्याबाबतचे कर्ज-मूल्य गुणोत्तर हे, आरबीआयने वेळोवेळी अपरिहार्य केलेल्या सर्वसाधारण सुवर्ण-कर्जाला लागु असल्यानुसार असेल. ह्या रोख्यांवरील लिन, प्राधिकृत बँकांद्वारे डिपॉझिटरीमध्ये मार्क केले जातील.
(13) कर आवश्यकता
आय कर अधिनियम 1961 च्या तरतुदीनुसार, ह्या रोख्यांवरील उत्पन्न कर पात्र असेल. प्रत्यक्ष सोन्यासाठी असल्याप्रमाणेच भांडवली नफा कर देय असेल.
(14) अर्ज
ह्या रोख्यांच्या वर्गणीसाठीचे अर्ज विहित केलेल्या अर्जाच्या फॉर्ममध्ये (फॉर्म ए) किंवा त्याच्या शक्य तेवढ्या जवळपास अशा स्वरुपात करुन त्यात किती ग्राम सोने व अर्जदाराचे संपूर्ण नाव व पत्ता स्पष्टपणे दिलेला असावा. स्वीकारकर्ते कार्यालय, अर्जदाराला ‘फॉर्म बी’ मध्ये पोच देईल.
(15) नामनिर्देशन
सरकारी सिक्युरिटीज अधिनियम 2006(2006 चा 38) आणि 1 डिसेंबर 2007 च्या भारतीय राजपत्राच्या कलम 4 च्या भाग 3 मध्ये प्रसिध्द केलेल्या सरकारी सिक्युरिटीज विनियम 2007 च्या तरतुदीनुसार, नामनिर्देशन करणे व ते रद्द करणे, अनुक्रमे फॉर्म डी व फॉर्म ई मध्ये केले जावे.
(16) हस्तांतरणीयता
1 डिसेंबर 2007 च्या भारतीय राजपत्रातील कलम 4 च्या भाग 3 मध्ये प्रसिध्द केल्यानुसार, सरकारी सिक्युरिटीज अधिनियम 2006 (2006 चा 38) आणि सरकारी सिक्युरिटीज विनियम 2007 च्या तरतुदीनुसार हे रोखे, फॉर्म एफ मधील हस्तांतरणाचा संलेख बजावून हस्तांतरणीय केले जाऊ शकतात.
(17) रोख्यांमधील व्यापारक्षमता
रिझर्व बँकेने अधिसूचित केलेल्या तारखेपासून हे रोखे ट्रेडिंग करण्यास पात्र असतील.
(18) वितरणासाठी कमिशन
वितरणासाठीचे कमिशन, स्वीकारर्कत्या कार्यालयांना मिळालेल्या अर्जावर मिळालेल्या एकूण वर्गणीच्या दर शंभर रुपयास एक रुपया ह्या दराने असेल, आणि अशा प्रकारे मिळालेल्या कमिशनपैकी 50% कमिशन, स्वीकारकर्ती कार्यालये, ज्यांच्यामार्फत हे व्यवहार मिळाले त्या एजंटांना किंवा सब-एजंटांना वाटून (शेअर) देतील.
(19) भारत सरकारच्या वित्त मंत्रालयाच्या (आर्थिक बाबी विभाग). एफ क्र.4(13) डब्ल्यु अँड एम/2008, दिनांक 8 ऑक्टोबर, 2008 ह्या अधिसूचनेमध्ये विहित केलेल्या इतर सर्व अटी व शर्ती ह्या रोख्यांनाही लागु होतील.
आपला
चंदन कुमार
उप महा व्यवस्थापक
सोबत : वरील प्रमाणे |