जानेवारी 1, 2015
बहुस्तरीय विपणन कार्यकृतीं विरुध्द आरबीआयचा सावधानतेचा इशारा
तत्वशून्य संस्थांना बळी पडू नये ह्यासाठी, बहुस्तरीय कार्यकृती (एमएलएम) विरुध्द भारतीय रिझर्व बँकेने जनतेला सावधान राहण्याचा इशारा दिला आहे. ह्या संस्थांच्या कार्यकृतींचे वर्णन करताना रिझर्व बँकेने सांगितले आहे की, एमएलएम/साखळी विपणन/पिरॅमिड रचना योजनांद्वारे, सभासद नोंदणी केल्यावर जलद व सुलभ पैसा मिळण्याचे आश्वासन दिले जाते. अशा योजनांखालील उत्पन्न मुख्यतः हे, त्या कंपन्या देऊ करत असलेल्या उत्पादांच्या विक्रीऐवजी, नोंदणी केलेल्या अधिकाधिक सभासदांना आकारण्यात येणा-या मोठमोठ्या शुल्कांमधून येत असते. पिरॅमिडच्या सर्वात वरच्या टोकावर असलेल्या सभासदांना, अशा वर्गणीचा एक भाग वाटण्यात येत असल्याने, अधिकतर सभासदांची नोंदणी करणे सर्व सभासदांना भाग पडते. ह्या साखळीमध्ये कोणताही भंग झाल्यास हा पिरॅमिड कोसळून पडतो आणि पिरॅमिडच्या तळाशी असलेल्या सभासदांची सर्वात जास्त हानी होते.
रिझर्व बँकेकडून सांगण्यात येत आहे की, अशा बहुस्तरीय विपणन/साखळी विपणन पिरॅमिड रचना योजनांनी दिलेल्या उच्चतर परतावा योजनांना जनतेने भुलू नये. रिझर्व बँक पुनश्च सांगत आहे की, अशा योजनांना बळी पडल्याने आर्थिक नुकसानच होते व जनतेने तिच्या हितासाठीच, अशा ऑफर्सना कोणताही प्रतिसाद देण्यापासून दूर रहावे.
रिझर्व बँकेने असेही सांगितले आहे की, प्राईज चिट अँड मनी र्सक्युलेशन (बॅनिंग) अधिनियम, 1978 अन्वये पैसा फिरविणे/बहुस्तरीय विपणन/पिरॅमिड रचना ह्याखाली पैशांचा स्वीकार करणे हा एक दखलपात्र गुन्हा आहे. अशा ऑफर्स नजरेस आल्यास, जनतेने त्याबाबत राज्य पोलिसांकडे ताबडतोब तक्रार करावी.
अल्पना किल्लावाला
प्रधान मुख्य महाव्यवस्थापक
वृत्तपत्रासाठी निवेदन : 2014 - 2015/1383 |