जानेवारी 06, 2017
लक्ष्मी विलास बँकेवर आरबीआयकडून दंड लागु
भारतीय रिझर्व बँकेने, लक्ष्मी विलास बँक लि. (एलव्हीबी) ह्यांना रु.30 दशलक्ष दंड ठोठावला आहे. हा दंड, चालु खाती उघडणे व चालविणे, संबंधीच्या सूचनांचे उल्लंघन करणे, ग्राहक नसलेल्या व वॉक-इन ग्राहक-व्यक्तींना बिल डिसकाऊंटिंग सुविधा देणे आणि केवायसी निकषांचे पालन न करणे ह्यासाठी लावण्यात आला आहे. भारतीय रिझर्व बँकेने वेळोवेळी दिलेल्या सूचना/निदेश/मार्गदर्शक तत्वे ह्यांचे केलेले उल्लंघन विचारात घेऊन, बँकिंग विनियामक अधिनियम, 1949 च्या कलम 46 (4)(1) सह वाचित, कलम 47 (अ)(1)(क) मधील तरतुदीनुसार तिला देण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करुन भारतीय रिझर्व बँकेने हा दंड ठोठावला आहे.
ही कृती विनियामक अनुपालनामधील त्रुटींवर आधारित असून, वरील बँक किंवा तिच्या ग्राहकांनी केलेले व्यवहार किंवा करार ह्यांच्या वैधतेबाबत नाही.
पार्श्वभूमी
वरील बँकेच्या एका शाखेत, बिल डिसकाऊंटिंग/खरेदी ह्यामध्ये अनियमितता होत असल्याची तक्रार भारतीय रिझर्व बँकेकडे आली होती. आरबीआयने ह्या अनियमिततांची तपासणी केली. आरबीआयने वरील बँकेकडून त्याबाबत स्पष्टीकरणही घेतले होते. आरबीआयने केलेली तपासणी व वरील बँकेने दिलेले स्पष्टीकरण ह्यांच्या आधारावर, भारतीय रिझर्व बँकेने दिलेल्या काही सूचना व विनियम ह्यांचे उल्लंघन केले गेले असल्याने, वरील बँकेला एक कारणे दाखवा नोटिस देण्यात आली होती.
वरील बँकेने दिलेले उत्तर, तसेच व्यक्तिगत सादरीकरणे व सादर केलेली माहिती व कागदपत्र ह्यांचा विचार करुन, भारतीय रिझर्व बँकेने निष्कर्ष काढला की उल्लंघने झाली असून त्यासाठी दंड लावणे आवश्यक आहे
अल्पना किलावाला
प्रधान सल्लागार
वृत्तपत्र निवेदन : 2016-2017/1811 |