जानेवारी 23, 2018
बँकिंग परवान्याचे रद्दीकरण - दि भोपाळ नागरिक सहकारी बँक लि., भोपाळ भारतीय रिझर्व बँकेने (आरबीआय), तिचे आदेश दिनांक जानेवारी 17, 2018 अन्वये, दि भोपाळ नागरिक सहकारी बँक लि. भोपाळ, मध्य प्रदेश, ह्यांचा बँकिंग व्यवसाय करण्याचा परवाना, जानेवारी 22, 2018 रोजी व्यवहार बंद झाल्यापासून रद्द केला आहे. रजिस्ट्रार ऑफ को-ऑपरेटिव सोसायटीज, मध्यप्रदेश ह्यांचाही, वरील बँक गुंडाळण्यासाठी व त्या बँकेसाठी एक लिक्विडेटर नेमण्यासाठी आदेश देण्याची विनंती केली गेली आहे.
पुढील कारणांसाठी वरील बँकेचा परवाना रिझर्व बँकेने रद्द केला आहे :
(1) वरील बँकेकडे सुयोग्य भांडवली रचना नाही तसेच मिळकतीच्या संभावनाही नाहीत. त्यामुळे, वरील बँक, बँकिंग विनियामक अधिनियम 1949 च्या कलम 56 सह वाचित, कलम 11(1) आणि कलम 22(3)(ड) च्या तरतुदी पूर्ण करत नाही.
(2) वरील बँक, तिच्या विद्यमान तसेच भावी ठेवीदारांना, त्यांच्या दाव्याच्या रकमा पूर्णपणे देण्याच्या स्थितीत नाही व त्यामुळे, वरील बँक, बँकिंग विनियामक अधिनियम 1949 च्या कलम 56 सह वाचित, कलम 22(3)(अ) मध्ये निर्देशित केलेली अट पूर्ण करु शकत नाही.
(3) वरील बँकेचे व्यवहार, विद्यमान तसेच भावी ठेवीदारांच्या हितसंबंधांना मारक/बाधक अशा रितीने करण्यात येत आहेत व त्यामुळे, ती बँक, बँकिंग विनियामक अधिनियम 1949 च्या कलम 56 सह वाचित, कलम 23 (3)(ब) मध्ये निर्देशित केलेली अट पूर्ण करत नाही.
(4) वरील बँकेने, भांडवल वाढविण्यासाठी व वित्तीय पुरर्रचना करण्यासाठी कोणतीही सकारात्मक पावले उचललेली नाहीत. आणि त्याचप्रमाणे त्यासाठी तिच्याकडे कोणतीही मूर्त स्वरुपातील/सफलताक्षम अशी पुनरुज्जीवन योजनाही नाही.
(5) वरील बँकेला टर्न अराऊंड करण्यासाठी भरपूर अवधी व संधी दिल्या गेल्या असूनही, वरील बँकेच्या वित्तीय स्थितीत, पुनरुज्जीवन होण्याची शक्यता नाही.
(6) वरील बँकेचा व्यवसाय असाच पुढे सुरु ठेवला गेल्यास, जनतेच्या हितसंबंधांवर विपरीत परिणाम होतील.
तिचा परवाना रद्द केल्यानंतर, दि भोपाळ नागरिक सहकारी बँक लि. भोपाळ, मध्यप्रदेश ह्यांना ‘बँकिंग’ चा व्यवसाय करण्यास ताबडतोब मनाई आहे. ह्यात बँकिंग विनियामक अधिनियम 1949 च्या कलम 56 सह वाचित, कलम 5 (ब) मध्ये व्याख्या केल्यानुसार ठेवींचा स्वीकार व ठेवींची परतफेड समाविष्ट आहे.
परवाना रद्द झाल्यामुळे व लिक्विडेशनची प्रक्रिया सुरु झाल्यावर, डीआयसीजीसी अधिनियम 1961 अनुसार, दि भोपाळ नागरिक सहकारी बँक लि. भोपाळ, मध्यप्रदेश ह्यांच्या ठेवीदारांना प्रदान करण्याची प्रक्रिया सुरु केली जाईल. लिक्विडेशन झाल्यानंतर, डिपॉझिट इन्शुअरन्स अँड क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशन (डीआयसीजीसी) ह्यांचेकडून, नेहमीच्या अटी व शर्तींवर, प्रत्येक ठेवीदाराला, त्याच्या/तिच्या ठेवींपैकी रु.1,00,000/- च्या मर्यादेपर्यंतची परतफेड मिळण्याचा हक्क असेल.
अजित प्रसाद
सहाय्यक सल्लागार
वृत्तपत्र निवेदन : 2017-2018/2010 |