एप्रिल 15, 2019
दि भीमावरम को-ऑपरेटिव्ह अर्बन बँक लि., भीमावरम (आंध्र प्रदेश) ह्यांना आरबीआयकडून निर्देश लागु
दि भीमावरम को-ऑपरेटिव अर्बन बँक लि., भीमावरम (आंध्र प्रदेश) ह्यांना, जनतेच्या हिताच्या दृष्टीने, काही निर्देश देणे आवश्यक असल्याबाबत भारतीय रिझर्व्ह बँकेचे समाधान झाले आहे. त्यानुसार, बँकिंग विनियामक अधिनियम 1949 च्या (सहकारी सोसायट्यांना लागु असलेला) कलम 56 सह वाचित कलम 35 अ च्या पोटकलम (1) खाली देण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करुन भारतीय रिझर्व्ह बँक येथे निर्देश देते की, दि भीमावरम को-ऑपरेटिव्ह अर्बन बँक लि., भीमावरम, आंध्र प्रदेश, मार्च 28, 2019 रोजीचे व्यवहार समाप्त झाल्यापासून, भारतीय रिझर्व्ह बँकेची लेखी पूर्व मंजुरी घेतल्याशिवाय, कोणतीही कर्जे किंवा अग्रिम राशी देणार नाही किंवा नूतनीकरण करणार नाही, कोणतीही गुंतवणुक करणार नाही, निधी कर्जाऊ घेणे व नवीन ठेवी स्वीकारणे ह्यासह कोणतेही दायित्व घेणार नाही, तिची जबाबदारी किंवा दायित्वे पूर्ण करण्यासाठी किंवा अन्यथा, खाली दिलेल्या रीती व व्याप्तीनुसार सोडल्यास, कोणत्याही प्रकारची तडजोड किंवा करार करुन तिच्या मालमत्तांची किंवा अॅसेट्सची विक्री, हस्तांतरण किंवा अन्यथा वासलात करणार नाही.
(1) प्रत्येक बचत बँक खाते, किंवा चालु खाते किंवा कोणतेही नाव दिलेले ठेव खाते ह्यामधील एकूण शिल्लक रकमेमधून ठेवीदाराला रु.1,000/- (रुपये एक हजार) पर्यंतची रक्कम काढण्यास परवानगी दिली जावी. - मात्र, त्या ठेवीदारावर बँकेचे कोणत्याही प्रकारचे दायित्व असल्यास, म्हणजे, कर्जदार किंवा हमीदार, ती रक्कम सर्वप्रथम संबंधित कर्ज खात्यात समायोजित केली जावी.
(2) विद्यमान मुदत ठेवींच्या परिपक्वतेनंतर, त्यांचे नूतनीकरण, त्याच नावे व त्याच क्षमतेत केले जाऊ शकते.
(3) वरील निर्देशामध्ये परवानगी असलेले खर्च करण्यास परवानगी आहे.
(4) सरकारी/एसएलआर मान्य सिक्युरिटीज मध्ये गुंतवणुक करण्यास परवानगी आहे.
भारतीय रिझर्व्ह बँकेने खास लेखी मंजुरी दिल्याशिवाय कोणतेही नवीन दायित्व स्वीकारु किंवा संपवू नये.
संबंधित जनतेच्या माहितीसाठी सविस्तर निर्देश वरील बँकेच्या कार्यालयात लावण्यात आले आहेत. परिस्थितीवर अवलंबून ह्या निर्देशात बदल करण्याचा विचार रिझर्व्ह बँक करु शकते.
आरबीआयने दिलेल्या ह्या निर्देशांचा अर्थ, आरबीआयने वरील बँकेचा बँकिंग परवाना रद्द केला आहे असा समजण्यात येऊ नये. वरील बँकेची आर्थिक स्थिती सुधारेपर्यंत ती बँक, तिचा बँकिंग व्यवसाय निर्बंधांसह करणे सुरु ठेवू शकते. हे निर्देश, मार्च 28, 2019 रोजीचे व्यवहार समाप्त झाल्यानंतर सहा महिन्यांच्या कालावधीसाठी पुनरावलोकनाच्या अटीवर जारी असतील.
अनिरुध्द डी. जाधव
सहाय्यक व्यवस्थापक
प्रेस प्रकाशन : 2018-2019/2454
|