सप्टेंबर 24, 2019
बँकिंग विनियामक अधिनियम 1949 च्या (एएसीएस) कलम 35 अ खालील निर्देश - पंजाब अँड महाराष्ट्र को - ऑपरेटिव बँक लि., मुंबई, महाराष्ट्र
भारतीय रिझर्व्ह बँकेने (आदेश दि. सप्टेंबर 23, 2019 अन्वये) पंजाब अँड महाराष्ट्र को-ऑपरेटिव बँक लि., मुंबई, महाराष्ट्र ह्यांना निर्देशांखाली ठेवले आहे. ह्या निर्देशानुसार, प्रत्येक बचत बँक खाते किंवा चालु खाते किंवा अन्य कोणतेही नाव दिलेले खाते ह्यामधील एकूण शिल्लक रकमेमधून ठेवीदारांना रु.1,000/- (रुपये एक हजार) पर्यंतची रक्कम, आरबीआयच्या वरील निर्देशांमधील अटींवर काढण्यास परवानगी देण्यात आली आहे. रिझर्व्ह बँकेची लेखी पूर्वमंजुरी घेतल्याशिवाय, पंजाब अँड महाराष्ट्र को-ऑपरेटिव बँक लि., मुंबई, महाराष्ट्र, कोणतीही कर्जे किंवा अग्रिम राशी देऊ किंवा नूतनीकृत करु शकणार नाही, कोणतीही गुंतवणुक करु शकणार नाही, निधी कर्जाऊ घेणे व नवीन ठेवी स्वीकारणे ह्यासह कोणतीही जबाबदारी घेणार नाही, तिचे दायित्व किंवा जबाबदारी पूर्ण करण्यासाठी किंवा अन्यथा कोणतेही प्रदान करणार नाही किंवा त्यासाठी राजी होणार नाही, कोणत्याही प्रकारची तडजोड किंवा व्यवस्था करुन, सप्टेंबर 23, 2019 रोजीच्या आरबीआयच्या निर्देशात अधिसूचित केल्यानुसार सोडल्यास, तिच्या कोणत्याही मालमत्तेची विक्री, हस्तांतरण किंवा अन्यथा वासलात लावणार नाही. सप्टेंबर 23, 2019 रोजीचे व्यवहार समाप्त झाल्यापासून सहा महिन्यांच्या कालावधीसाठी हे निर्देश वरील बँकेवर जारी असतील.
भारतीय रिझर्व्ह बँकेने हे निर्देश दिले ह्याचा अर्थ, भारतीय रिझर्व्ह बँकेने वरील बँकेचा बँकिंग परवाना रद्द केला आहे असा घेण्यात येऊ नये. वरील बँकेची आर्थिक स्थिती सुधारेपर्यंत ती बँक तिचा बँकिंग व्यवसाय निर्बंधांसह करणे सुरु ठेवू शकते. परिस्थितीवर अवलंबून ह्या निर्देशात बदल करण्याचा विचार भारतीय रिझर्व्ह बँक करु शकते.
बँकिंग विनियामक अधिनियम 1949 च्या कलम 56 सह वाचित कलम 35 अ च्या पोटकलम (1) खाली तिला देण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करुन रिझर्व्ह बँकेने हे निर्देश जारी केले आहेत. सप्टेंबर 23, 2019 रोजीच्या निर्देशाची एक प्रत, संबंधित जनतेच्या माहितीसाठी वरील बँकेच्या कार्यालयात लावण्यात आली आहे.
योगेश दयाल
मुख्य महाव्यवस्थापक
प्रेस प्रकाशन : 2019-2020/766 |