(डिसेंबर 26, 2018 रोजी अद्यावत केलेले)
(1) हे बाँड्स कोण देऊ शकतो ?
कोणतीही कॉर्पोरेट संस्था (कंपनीज अधिनियम 1956/2013 खाली, एक कंपनी म्हणून पंजीकृत झालेली संस्था) किंवा बॉडी कॉर्पोरेट (संसदेच्या विशेष अधिनियमाने खास निर्माण केलेली संस्था) आणि भारतीय बँका, विदेशामध्ये रुपये मूल्यातील बाँड्स देऊ शकतात. सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडियाच्या (सेबी) विनियामक अधिकारक्षेत्राखाली येणा-या रियल इस्टेट इनवेस्टमेंट ट्रस्ट (आरईआयटी) व इन्फ्रास्ट्रक्चर इनवेस्टमेंट ट्रस्ट (आयएनव्हीआयटी) ह्यादेखील त्यासाठी पात्र आहेत. मर्यादित जबाबदारी भागीदारी व भागीदारी संस्था/कंपन्या ह्यासारख्या निवासी संस्थाही हे बाँड्स देण्यासाठी पात्र आहेत.
(2) हे बाँड्स कुठे देता येऊ शकतात ?
रुपये मूल्यातील बाँड्स केवळ एका देशातच देता येऊ शकतात व देशातील निवासी व्यक्तीच त्यासाठी वर्गणी देऊ शकते :-
-
तो देश, वित्तीय कारवाई कृती दलाचा (एफएटीएफ) सभासद आहे किंवा एफएटीएफ प्रकारच्या प्रादेशिक संस्थेचा सभासद आहे. आणि
-
ज्याचा सिक्युरिटीज मार्केट रेग्युलेटर हा, इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन ऑफ सिक्युरिटीज कमिशनच्या (आयओएससीओ) मल्टिलॅटरल मेमोरँडम ऑफ अंडरस्टँडिंगचा एक स्वाक्षरीकर्ता (जोडपत्र अ - स्वाक्षरीकर्ते) किंवा माहिती शेअर करण्याच्या व्यवस्थांसाठी सेबीबरोबरच्या बायलॅटरल मेमोरँडम ऑफ अंडरस्टँडिंगचा स्वाक्षरीकर्ता आहे आणि
एफएटीएफच्या सार्वजनिक निवेदनात पुढीलप्रमाणे ओळख देण्यात आलेला देश नसावा :-
(1) असे एक अधिकारक्षेत्र की ज्यात अँटी मनी लाँडरिंग किंवा दहशतवादाला वित्तसहाय्य करण्यासाठी सामना करण्यामधील आणीबाणीच्या त्रुटी असून, त्याबाबतचे प्रति-उपाय लागु आहेत किंवा
(2) असे एक अधिकारक्षेत्र की ज्याने त्या त्रुटी दूर करण्यात पुरेशी प्रगती केलेली नाही किंवा त्या त्रुटींना दूर करण्यासाठी वित्तीय कारवाई दलाबरोबर एक कृती योजना तयार केलेली नाही.
(3) अशा बाँड्समध्ये गुंतवणुक किंवा वर्गणी देऊ शकतो ?
वरील 2 मध्ये दिलेला निकष पूर्ण करणा-या देशामध्ये रहिवासी असलेल्या एखाद्या निवेशकाला किंवा, जेथे भारत हा सभासद-देश असलेल्या, मल्टिलॅटरल व प्रादेशिक वित्तीय संस्थेला, रुपये मूल्यातील बाँड्समध्ये गुंतवणुक/वर्गणी देता येऊ शकते. तथापि, आयएनडी-एएस 24 मध्ये दिलेल्या अर्थातील संबंधित पक्ष अशा बाँड्समध्ये गुंतवणुक किंवा वर्गणी किंवा खरेदी करु शकत नाही.
(4) भारतीय बँका हे बाँड्स देऊ शकतात काय ?
होय. भारतीय बँका पुढील स्वरुपात हे बाँड्स देऊ शकतात - (1) अतिरिक्त टायर 1 भांडवल म्हणून समावेश करण्यासाठी पात्र असलेले परपेच्युअल कर्ज संलेख (पीडीआय) व टायर 2 भांडवल म्हणून समावेश करण्यासाठी पात्र असलेले कर्ज भांडवल संलेख आणि (2) पायाभूत सोयी व परवडणारे गृहनिर्माण ह्यांना वित्तसहाय्य करण्यासाठीचे विदेशातील दीर्घ मुदतीचे रुपये मूल्यातील बाँड्स. भारतीय बँकांनी खात्री करुन घ्यावी की, त्यांनी विदेशात दिलेले रुपये मूल्यामधील बाँड्स, बेसेल 3 भांडवली विनियमावरील महापरिपत्रक डीबीआर.क्र.बीपी.बीसी.1/21.06.201/2015-16 दि. जुलै 1, 2015 व बँकांद्वारे दीर्घ मुदतीचे बाँड्स दिले जाणे - पायाभूत सोयी व परवडणारे गृहनिर्माण ह्यावरील मार्गदर्शक तत्वे वरील रिझर्व बँकेने दिलेले व वेळोवेळी सुधारित केलेले परिपत्रक डीबीओडी.बीपी.बीसी.क्र.25/08.12.014/2014-15 दि. जुलै 15, 2014 ह्यामधील तरतुदींना अनुसरुन देण्यात आले आहेत.
(5) विदेशात रुपये मूल्यामधील बाँड्स देण्याच्या प्रक्रियेत भारतीय बँका अन्य कोणत्याही प्रकारे भाग घेऊ शकतात काय ?
प्रायमरी मार्केटमध्ये विदेशात दिलेल्या आरडीबी मध्ये भारतीय बँका वर्गणी देऊ शकत नाहीत, परंतु प्रुडेंशियल नॉर्म्स पूर्ण केले असल्यास त्या बँक अरेंजर्स/अंडररायटर्स/मार्केट मेकर्स/ट्रेडर्स होऊ शकतात. ह्याशिवाय, सप्टेंबर 19, 2018 पूर्वी दिलेल्या बाँड्ससाठीच्या अंडररायटिंगमुळे भारतीय बँका आता 5% पेक्षा अधिक आरडीबी धारण करु शकतात - मात्र त्यासाठी, बाँड दिल्याच्या तारखेपासून 6 महिन्यांच्या कालावधीची मर्यादा तेव्हा संपलेली नसावी तसेच प्रुडेंशियल नॉर्म्स पूर्ण केलेले असावेत.
(6) अशा बाँड्सची किमान परिपक्वता किती असेल ?
प्रति वित्तीय वर्ष युएसडी 50 दशलक्षच्या आयएनआर सममूल्य रकमेपर्यंत उभ्या केलेल्या मसाला बाँड्ससाठीचा किमान परिपक्वता कालावधी 3 वर्षांचा असेल आणि प्रति वित्तीय वर्ष युएसडी 50 दशलक्षच्या आयएनआर सममूल्यापेक्षा जास्त रकमेसाठी उभ्या केलेल्या बाँड्ससाठी तो 5 वर्षे असेल. ह्या बाँड्सची वर्गणी/विमोचन ट्रांचेसमध्ये असल्यास, किमान सरासरी परिपक्वताकाल, वर दिल्यानुसार 3/5 वर्षे असावा.
(7) ह्या रुपये बाँड्समध्ये, पूर्वप्रदानाचा पर्याय, बाँड देणाराला उपलब्ध आहे काय ?
लागु असलेली परिपक्वता पूर्ण होण्यापूर्वी, पूर्वप्रदानासाठी, ह्या बाँड्समध्ये पर्यायात्मक खंड असू शकत नाही.
(8) हे बाँड्स खाजगीरीत्या प्लेस करता येऊ शकतात काय ?
होय. यजमान देशाच्या विनियमानुसार हे बाँड्स खाजगीत प्लेस करता येऊ शकतात किंवा एक्सचेंजेसवर लिस्ट करता येतात.
(9) अशा बाँड्सच्या सर्वसमावेशक मूल्यावर मर्यादा आहे काय ?
अशा बाँड्सवरील सर्वसमावेशक मूल्याची मर्यादा, भारत सरकारच्या त्याच परिपक्वतेचे विद्यमान/प्रचलित उत्पन्न अधिक 450 बेसिस पॉईंट्स एवढा असेल.
(10) रुपये मूल्यामधील बाँड्स देण्यासाठीचे अर्ज कोठे सादर करावेत ?
पात्र असलेल्या भारतीय संस्थांकडून, स्वयंचलित मार्गाखाली किंवा मंजुरी मार्गाखाली, रुपये मूल्यातील बाँड्स देण्यासाठी केलेले अर्ज, केवळ एडी बँकेमार्फतच, रिझर्व बँकेच्या विदेशी मुद्रा विभाग, केंद्रीय कार्यालय, मुंबई येथे सादर केले जावेत.
(11) रुपये मूल्यामधील बाँड्सचे उत्पन्न कोणकोणत्या हेतूसाठी वापरता येते ?
पुढील गोष्टी सोडल्यास ते उत्पन्न इतर सर्व हेतूंसाठी वापरता येऊ शकते.
(1) इंटिग्रेटेड टाऊनशिप/परवडणारे गृहनिर्माण प्रकल्प ह्यांचा विकास ह्यासाठी सोडून अन्य रियल इस्टेट कार्यकृती
(2) भांडवली बाजारात गुंतवणुक करणे आणि त्याचे उत्पन्न देशांतर्गत इक्विटी गुंतवणुकीत करणे.
(3) विदेशी थेट गुंतवणुकीच्या (एफडीआय) मार्गदर्शक तत्वांनुसार मनाई असलेल्या कार्यकृती.
(4) वरीलपैकी कोणत्याही उद्देशाने इतर संस्थांना कर्ज देणे.
(5) जमीन खरेदी करणे.
(12) वरील 11 मध्ये निर्देशित न केलेल्या अंतिम उपयोगाबाबत काही आवश्यकता आहेत काय ?
हे अंतिम उपयोग, लागु असलेले इतर कायदे व विनियम ह्याला अनुसरुन असावेत व त्यासाठी संबंधित क्षेत्रीय विनियमकाने परवानगी दिलेली असावी.
(13) ह्या बाँड्सची विक्री/हस्तांतरण/प्लेज करण्यास परवानगी आहे काय ?
होय. प्रश्न क्र. 2 व 3 मधील अटी पूर्ण केलेल्या असल्यासच विदेशात ह्या बाँड्सची विक्री/हस्तांतरण/प्लेज मुक्ततेने करण्यास परवानगी आहे.
(14) विदेशात रुपये मूल्यामधील बाँड्स देऊन मिळालेले उत्पन्न वर 11 मध्ये दिल्याव्यतिरिक्त इतर रियल इस्टेट कार्यकृतींसाठी वापरता येऊ शकते काय ?
नाही.
(15) अनिवासी गुंतवणुकदार त्यांच्या एक्सपोझरचे हेजिंग करण्यास पात्र असेल काय ?
अनिवासी गुंतवणुकदार, रुपये मूल्यातील बाँड्सच्या एक्सपोझरचे हेजिंग, भारतामधील एडी वर्ग-1 बँकांच्या परवानगीप्राप्त डेरिवेटिव उत्पादांमार्फत करण्यास पात्र असतील. त्याचप्रमाणे, गुंतवणुकदार, विदेशात असलेल्या भारतीय बँकांच्या शाखा/दुय्यम कंपन्यांमार्फत किंवा विदेशात भारतीय उपस्थिती असलेल्या विदेशी बँकांच्या शाखांमार्फत, देशांतर्गत मार्केटमध्ये, बॅक-टु-बॅक धर्तीवर प्रवेश करु शकतात.
(16) अशा बाँड्ससाठी, विदेशी मुद्रा-रुपये रुपांतरण ह्यासाठीचा विनिमय दर काय असेल ?
विदेशी मुद्रा-रुपये रुपांतरणासाठीचा दर हा, इश्युसाठी व सर्व्हिसिंगसाठी केलेल्या व्यवहारांच्या तडजोडीच्या तारखेस असलेल्या मार्केट रेट एवढा असेल. ज्यात रिडेम्प्शनचा समावेश असेल.
(17) विदेशी इक्विटी धारकाकडून ईसीबी उभे करण्यास लागु असलेले ईसीबी लायाबिलिटी : इक्विटी गुणोत्तर, रुपये मूल्यातील बाँड्ससाठीही लागु आहे काय ?
नाही.
(18) अशा बाँड्सच्या बाबतीत अहवाल-आवश्यकता कोणत्या आहेत ?
ईसीबींना लागु असल्याप्रमाणेच, भारतीय रिझर्व बँकेकडून कर्ज पंजीकरण क्रमांक (एलआरएन) मिळविल्यानंतरच बाँड्स दिले जाऊ शकतात. नेमलेल्या एडी वर्ग 1 बँकेला कर्जदारांनी फॉर्म 83 च्या प्रमाणित केलेल्या दोन प्रती सादर करणे आवश्यक आहे. त्यावर, एडी वर्ग 1 बँक त्याची एक प्रत, एलआरएन मिळविण्यासाठी, संचालक, बॅलन्स ऑफ पेमेंट्स सांख्यिकी व माहिती व्यवस्थापन विभाग, (डीएसआयएम) भारतीय रिझर्व बँक, वांद्रा-कुर्ला संकुल, मुंबई - 400051 ह्यांचेकडे पाठवील. ईसीबी 2 रिटर्नद्वारे अहवाल पाठविणेही आवश्यक आहे. ह्याशिवाय कर्जदाराने, सरकार किंवा अन्य विनियामक/संस्था/कायदे ह्यानुसार आवश्यक असा रिपोर्टिंग आवश्यकता पूर्ण करणे/बाँड्स देण्याबाबतचा तपशील सादर करणे आवश्यक आहे.
(19) विदेशात रुपये मूल्यातील बाँड्स देणा-या संस्थेला, ह्या बाँड्समुळे निर्माण होणा-या विदेशी मुद्रा जोखमी येऊ शकतात काय ?
विदेशात रुपये मूल्यातील बाँड्स देणा-या कोणत्याही संस्थेला, त्या बाँड्समुळे निर्माण होणारी जबाबदारी कोणत्याही प्रकारे विदेशी मुद्रा जबाबदारीत रुपांतरित करण्यास किंवा डेरिवेटिव काँट्रॅक्ट करुन किंवा अन्यथा कोणत्याही प्रकारे विदेशी मुद्रा जोखीम घेण्यास परवानगी नाही.
(20) बाह्य वाणिज्य कर्जांचा (ईसीबी) साचा, विदेशात रुपये मूल्यातील बाँड्स देण्याच्या साचावर ओव्हरलॅप होतो काय ?
नाही. हे दोन साचे वेगवेगळ्या प्रकारे कार्य करतात. उदा.-ईसीबी साचाखाली कर्ज घेण्याची मर्यादा, विदेशात रुपयात बाँड्स देण्याच्या साचाखाली कर्ज घेण्यापेक्षा वेगळी आहे. |