(नोव्हेंबर 30, 2016 रोजी अद्यावत केल्यानुसार)
(1) चेक ट्रंकेशन प्रणाली म्हणजे काय ?
एखाद्या ड्रॉवरने दिलेल्या चेकची, सादरर्कत्या बँकेद्वारे प्रदानर्कत्या बँकेकडे होणारी प्रत्यक्ष हालचाल/प्रगती, एखाद्या बिदुंवर थांबविण्याची प्रक्रिया म्हणजेच ट्रंकेशन. ह्या प्रक्रिये ऐवजी, त्या चेकची इलेक्ट्रॉनिक प्रतिमा, समाशोधन गृहामार्फत, (एमआयसीआर बँडवरील माहिती, सादर केल्याची तारीख, सादरकर्ती बँक इ. ह्यासह) प्रदानर्कत्या बँकेकडे पारेषित केली जाते. ह्यामुळे, समाशोधन करण्यासाठी, तो संलेख बँक शाखांमध्ये प्रत्यक्ष पाठवत/फिरवत ठेवण्याची आवश्यकता (अपवादात्मक प्रकरणे सोडल्यास) टाळली जाते. ह्यामुळे प्रत्यक्ष चेक पाठविण्याचा खर्च टाळता येतो, ते गोळा करण्यासाठीचा वेळही कमी होतो, आणि संपूर्ण चेक-प्रक्रियाही सुरेखित होते.
(2) भारतामध्ये चेक ट्रंकेशनची गरज काय ?
वर सांगितल्याप्रमाणे, चेक ट्रंकेशनमुळे चेक गोळा करण्याची प्रक्रिया गतिमान होते व त्यामुळे ग्राहकांना अधिक चांगली सेवा मिळते, ने-आण करताना चेक गहाळ होण्याची शक्यता कमी होते, चेक गोळा करण्याचा खर्च कमी होतो आणि मेळ घालण्याबाबतचे आणि लॉजीस्टिक्स संबंधित प्रश्न येत नसल्याने, संपूर्ण प्रणालीला लाभ होतो.
आरटीजीएस व एनईएफटी ह्यासारखे महत्वाचे उत्पाद देण्यासह, रिझर्व बँकेने, ह्याद्वारे, आंतर बँकीय अशी ग्राहकांना करायची प्रदाने ऑनलाईन व जवळजवळ त्याचवेळी (रियल टाईम) करावयाची क्षमता निर्माण केली आहे. तथापि, अजूनही प्रदान करण्यासाठी चेक देणे हीच प्रमुख पध्दत आपल्या देशात रुजली आहे. ह्यासाठी, भारतीय रिझर्व बँकेने चेक-समाशोधन-चक्राची कार्यक्षमता सुधारण्यावर लक्ष केंद्रित केले आहे. चेक ट्रंकेशन प्रणाली (सीटीएस) देऊ करणे हे ह्या दिशेने उचललेले एक पाऊल आहे.
कार्यकारी क्षमता वाढविण्या व्यतिरिक्त, सीटीएस, बँका व ग्राहकांना अनेक लाभ देऊ करते (मनुष्यबळाची तर्कसंगती, परिणामकारक खर्च, व्यवहार प्रक्रियेची पुनर्रचना, अधिक चांगली सेवा, आधुनिक तंत्रज्ञानाचे अनुसरण इ. सह). अशा प्रकारे, प्रदान प्रणालीच्या क्षेत्रात, सीटीएस म्हणजे कार्यक्षमता वाढविण्यासाठी रिझर्व बँकेने घेतलेला एक महत्वाचा पुढाकारच ठरतो.
(3) सीटीएसच्या अंमलबजावणीबाबत आपल्या देशात काय परिस्थिती आहे ?
नवी दिल्ली, चेन्नई व मुंबई येथे अनुक्रमे फेब्रुआरी 1, 2008; सप्टेंबर 24, 2011 आणि एप्रिल 21, 2013 पासून सीटीएसची अंमलबजावणी सुरु झाली आहे. एमआयसीआर प्रणालीमधून चेक्सचे संपूर्ण आकारमान सीटीएसमध्ये हलविल्यानंतर, पारंपारिक एमआयसीआर-आधारित चेक-प्रक्रिया देशभरात बंद करण्यात आली आहे.
(4) देशात सीटीएसची अंमलबजावणी करण्याबाबतचा नवीन दृष्टिकोन कोणता ?
राष्ट्रीय रोल-आऊटचा एक भाग म्हणून पाहण्यात येत असलेला नवा दृष्टिकोन हा, ग्रिड आधारित दृष्टिकोन आहे. ह्या दृष्टिकोनाखाली एमआयसीआर चेक प्रक्रिया करणा-या, देशातील 66 ठिकाणांमधून ह्यापूर्वी समाशोधित केल्या जाणारे चेक्सचे संपूर्ण आकारमान, नवी दिल्ली, चेन्नई व मुंबई मधील ग्रिडस मध्ये एकत्रित केले जाईल.
ह्यामधील प्रत्येक ग्रिड, तिच्या संबंधित कार्य क्षेत्रातील सर्व बँकांना प्रक्रिया व समाशोधन सेवा उपलब्ध करते. एखाद्या ग्रिडच्या कार्यक्षेत्राखाली असलेल्या बँका, शाखा तसेच छोट्या/दूरवरच्या ठिकाणी असलेले ग्राहक ह्यांना लाभ होईल - मग, सध्या औपचारिक अशी चेक समाशोधनाची किंवा अन्य व्यवस्था तेथे असो किंवा नसो, ह्या तीन ग्रिडसची कार्यक्षेत्रे उदाहरणादाखल खाली दिली आहेत.
-
नवी दिल्ली ग्रिड : नवी दिल्लीचा राष्ट्रीय राजधानी प्रदेश, हरयाणा, पंजाब, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, बिहार, झारखंड, राजस्थान आणि चंदीगढचा केंद्रशासित प्रदेश.
-
मुंबई ग्रिड : महाराष्ट्र, गोवा, गुजराथ, मध्यप्रदेश व छतीसगड.
-
चेन्नई ग्रिड : आंध्र प्रदेश, तेलंगणा, कर्नाटक, केरळ, तामिळनाडू, ओडिशा, पश्चिम बंगाल, आसाम व पुडुचेरीचा केंद्रशासित प्रदेश.
(5) स्पीड क्लियरिंग विरुध्द ग्रिड आधारित समाशोधनाचे, ग्राहकासाठी कोणते फायदे आहेत ?
बाहेरगावच्या चेक संकलनाच्या तुलनेत, स्पीड क्लियरिंगमुळे चेक संकलनाची प्रक्रिया जलद होत असली तरी, त्यासाठी, समाशोधन गृहाच्या जवळ प्रदानकर्ती बँक शाखा असणे आवश्यक असते. ह्याच्या तुलनेने, ग्रिड आधारित सीटीएस ही अधिक श्रेष्ठ प्रणाली आहे. कारण ती अधिक मोठे भौगोलिक क्षेत्र समावून घेते आणि प्रदानकर्ती बँकेचे ग्रिडजवळ असणे क्वचितच संभवते.
ग्रिड आधारित चेक ट्रंकेशन समाशोधन प्रणालीखाली, त्या ग्रिडच्या कार्यक्षेत्राखाली असलेल्या बँक शाखांवर वटलेले सर्व चेक्स हे स्थानिक चेक्स समजून समाशोधित केले जातात. संकलन करणारी बँक व प्रदानकर्ती बँक ह्या दोन्हीही बँका, त्याच सीटीएस ग्रिडच्या कार्यक्षेत्राखाली असल्यास, त्या दोन वेगवेगळ्या शहरात असल्या तरीही, चेक-संकलन आकार लावला जाऊ नये.
(6) सीटीएसमधील संपूर्ण प्रक्रियेचा प्रवाह थोडक्यात सांगता येईल काय ?
सीटीएसमध्ये, सादरकर्ती बँक (किंवा शाखा), एमआयसीआर बँडवरील माहिती आणि त्यांच्या कॅपचर सिस्टिमचा वापर करुन (ह्यात एक स्कॅनर, कोअर बँकिंग किंवा अन्य अॅप्लिकेशन असते) त्या चेकच्या प्रतिमा येते/मिळवते. ह्यासाठी, डेटा व प्रतिमा ह्यासाठीची मानके व गुणविशेष पूर्ण केली असण्याची आवश्यकता असते.
सुरक्षा, सुरक्षितता आणि डेटा/प्रतिमा नाकारल्या जाणार नाहीत ह्याची खात्री करण्यासाठी, सीटीएसमध्ये, एंड-टु-एंड पब्लिक की इन्फ्रास्ट्रक्चर (पीकेआय) टाकण्यात आले आहे. आवश्यकतेचा एक भाग म्हणून, संकलन बँक (सादरकर्ती बँक), डेटा आणि मिळविलेल्या प्रतिमा, डिजिटल सही करुन व सांकेतिक (एनक्रिप्ट) करुन, केंद्रीय प्रक्रियेच्या ठिकाणा (समाशोधन गृह) कडे, प्रदानर्कत्या बँकेकडे म्हणजे डेस्टिनेशन किंवा ड्रॉवी बँकेकडे पाठविण्यासाठी) पाठविते. ह्यात भाग घेण्यासाठी, सादरर्कत्या व प्रदानर्कत्या बँकांना, क्लियरिंग हाऊस इंटरफेस (सीएचआय) नावाचा इंटरफेस/द्वार देण्यात येतो. ह्या इंटरफेसमुळे जोडणीसह डेटा व प्रतिमा सुरक्षा व सुरक्षिततेसह, प्रदान प्रक्रिया करण्यासाठी समाशोधन गृहात (सीएच) पाठविण्यास मदत होते.
समाशोधन गृह ह्या डेटावर प्रक्रिया करुन, समायोजनाची रक्कम निश्चित करते आणि त्या प्रतिमा व संबंधित डेटा प्रदानर्कत्या बँकांना पाठविते. ह्याला सादरीकरण समाशोधन (प्रेझेंटेशन क्लियरिंग) म्हणतात. प्रदान प्रक्रिया करण्यासाठी प्रदानर्कत्या बँकांना त्यांच्या सीएचआयमार्फत, समाशोधन गृहामधून प्रतिमा व डेटा मिळतो.
प्रदानर्कत्या बँकांचा सीएचआय, वटवल्या न गेलेल्या संलेखांसाठीची रिटर्न फाईल निर्माण करते. प्रदानर्कत्या बँकांनी पाठविलेल्या रिटर्न फाईल्स/डेटा वर समाशोधन गृहाद्वारे, रिटर्न क्लियरिंग सेशन मध्ये केली जाणारी प्रक्रिया ही, प्रेझेंटेशन क्लियरिंग प्रमाणेच केली जाते आणि सादरर्कत्या बँकांना प्रक्रिया करण्यासाठी रिटर्न डेटा पाठविला जातो.
प्रेझेंटेशन क्लियरिंग व त्याच्याशी संलग्न रिटर्न क्लियरिंग ह्या दोन्हीही सत्रांमधील प्रक्रिया यशस्वी झाल्यावरच समाशोधन चक्र (क्लियरिंग सायकल) पूर्ण होते. सीटीएस तंत्रज्ञानामधील सार किंवा मूलतत्व हे, प्रदान प्रक्रियेमध्ये चेक्सच्या प्रतिमा (प्रत्यक्ष चेक्स ऐवजी) वापरण्यातच आहे.
(7) सीटीएसमार्फत समाशोधन करण्यासाठी कोणत्या प्रकारचे संलेख सादर करता येतात ?
सीटीएसमार्फत जलदतेने वटविले जाण्यासाठी, सीटीएस 2010 मानकांचे निकष पूर्ण करणारे संलेख सादर करणे योग्य असते. सीटीएस 2010 मानकानुसार नसलेले संलेख स्वीकारले जात राहतीलच, परंतु ते कमी वारंवारतेने (म्हणजे आठवड्यातून एकदा) समाशोधित केले जातील.
(8) ग्राहकांसाठी असलेल्या रीतींमध्ये काही बदल होईल काय ?
नाही. ग्राहकांसाठी, समाशोधन प्रक्रियेत कोणताही मोठा बदल नाही. सध्या असलेले चेक्स वापरणे ग्राहकांनी सुरुच ठेवावे. फक्त चेक लिहित असताना प्रतिमा-स्नेही रंगाची शाई वापरण्याची खात्री करावी. अर्थातच, प्रदान केलेले संलेख मिळत असलेल्या (सरकारी विम्यांसारखे) ग्राहकांना चेकच्या प्रतिमाच मिळतील. मटेरियल फील्ड्समध्ये (सविस्तर माहिती पुढे दिली आहे) बदल/खोडाखोड केलेल्या चेक्सवर सीटीएस प्रणालीमध्ये प्रक्रिया करण्यास परवानगी नाही.
(9) बँकेच्या ग्राहकांना सीटीएसचे फायदे कोणते ?
लाभ अनेक आहेत. इमेजिंग व ट्रंकेशन केल्यामुळे संलेखाची प्रत्यक्ष ने-आण थांबते. त्याचप्रमाणे प्रतिमांची हालचाल इलेक्ट्रॉनिक रितीने केली जात असल्याने, समाशोधन चक्रही कमी/लहान होते. ह्याशिवाय, विद्यमान समाशोधन प्रणालीवरील भौगोलिक किंवा कार्यक्षेत्राच्या मर्यादाही नाहीशा होतात. अशा प्रकारे, निरनिराळ्या बँकांबाबत असलेल्या व निरनिराळे सेवास्तर असलेल्या समाशोधनांच्या भागांचे एकत्रीकरण होऊन, त्याचे रुपांतर देशभरात एकसमान प्रक्रिया व कार्यरीती असलेल्या एका प्रमाणित समाशोधन प्रणालीत होते.
ग्रिड आधारित चेक ट्रंकेशन प्रणाली समाशोधनामध्ये, त्या ग्रिडच्या कार्यक्षेत्रात असलेल्या बँक शाखांवर काढलेले सर्व चेक्स स्थानिक चेक्स समजून त्यावर प्रक्रिया केली जाते. संकलक बँक व प्रदानकर्ती बँक ह्या दोन्हीही त्याच सीटीएस ग्रिडच्या कार्यक्षेत्रात असल्यास, कोणतेही बाहेरगावचे चेक्स गोळा करण्याचे/स्पीड क्लियरिंग आकार लावले जाऊ नयेत - त्या बँका निरनिराळ्या शहरात असल्या तरीही.
सीटीएसमुळे चेक देणारांनाही लाभ होतो. कॉर्पोरेट कंपन्यांना, त्यांच्या अंतर्गत गरजांसाठी (असल्यास) त्यांच्या बँकर्सकडून चेक्सच्या प्रतिमा दिल्या जाऊ शकतात.
अशाप्रकारे, सीटीएसमुळे संपूर्ण चेक प्रक्रियेला व समाशोधनाला एक सुरेखता प्राप्त होते. सीटीएसमुळे होणा-या लाभांचा सारांश पुढीलप्रमाणे आहे.
-
समाशोधन चक्राचा कालावधी कमी
-
चांगल्या दर्जाची पडताळणी व मेळ घालण्याची प्रक्रिया
-
कार्यक्षेत्राबाबत भौगोलिक निर्बंध नाहीत
-
बँका व ग्राहक ह्या दोन्हीहींसाठी समान कार्यक्षमता
-
कार्यकारी जोखीम व कागदपत्रांद्वारे केलेल्या समाशोधनातील जोखमी कमी होतात
-
ग्रिडच्या कार्यक्षेत्रात असलेल्या बँकेवर काढलेला चेक गोळा करण्यासाठी संकलन आकार नाहीत.
(10) ग्रिड आधारित सीटीएसचे बँकिंग प्रणालीसाठी कोणते लाभ आहेत ?
ग्रिड आधारित सीटीएसमुळे खर्च लक्षणीयतेने वाचतो. समाशोधन करण्याच्या जागांचे काही थोड्याच ग्रिड्समध्ये एकत्रीकरण केल्यामुळे, एमआयसीआर यंत्रे व संबंधित एएमसी खर्चातील गुंतवणुक कमीत कमी होते. निरनिराळ्या समाशोधन ठिकाणी इनवर्ड चेक प्रोसेसिंगसाठीच्या पायाभूत सोयी ठेवण्याची आवश्यकता सीटीएस ग्रिडमुळे टाळली जात असल्याने बँकांना इकॉनॉमीज ऑफ स्केल पासूनचे लाभ होतील. अनेक स्थानिक समाशोधन गृहांचे, सीटीएस ग्रिडमध्ये विलीनीकरण झाल्यामुळे, अनेक समाशोधन ठिकाणांमध्ये विखुरलेली समायोजने ही एकाच समायोजनात परिवर्तित होतात व त्यामुळे बँकांच्या लिक्विडिटी आवश्यकता लक्षणीय रितीने कमी होतात.
त्याचप्रमाणे, चेक-प्रक्रिया कमी झाल्याने, कार्यकारी ओव्हरहेड खर्च कमी झाल्याने, समाशोधनातील फरक/मतांतरे व मेळ घालण्याबाबतचे प्रश्न नाहीसे झाल्याने सीटीएसमुळे इतरही लाभ होतात.
(11) ग्राहकाला कोणत्याही कारणाने त्याने दिलेला चेक प्रत्यक्ष पाहावयाचा असल्यास त्यासाठी कोणते पर्याय आहेत ?
सीटीएसखाली, प्रत्यक्ष चेक्स सादरर्कत्या बँकेमध्येच ठेवले जातात, आणि ते प्रदानर्कत्या बँकेकडे पाठविले जात नाहीत. ग्राहकाने तशी इच्छा व्यक्त केल्यास, बँका त्या चेक्सच्या प्रमाणित/सत्यांकन केलेल्या प्रतिमा देऊ शकतात. तथापि, ग्राहकाने, प्रत्यक्ष चेक मागितल्यास/पाहण्याची इच्छा केल्यास, त्यासाठी सादरर्कत्या बँकेकडेच जावे लागेल आणि त्यासाठी, त्याच्या/तिच्या बँकेकडेच तशी विनंती करावी लागेल. ह्यासाठी खर्च/आकारही लावला जाऊ शकतो. कायदेशीर आवश्यकता पूर्ण करण्यासाठी, चेक्सचे ट्रंकेटिंग करणा-या बँकेने, तो प्रत्यक्ष चेक 10 वर्षे जपून ठेवणे आवश्यक आहे.
(12) चेकची प्रत्यक्षात असलेली एकमेव अशी लक्षणे, त्या चेकच्या प्रतिमेमध्ये कशी टाकली जातात ?
भारतामधील सीटीएसमध्ये केवळ विहित केलेल्या प्रतिमा-गुणविशेष/निकष ह्यांचाच उपयोग करणे अनिवार्य करण्यात आले आहे. ह्या निकषांनुसार नसलेल्या प्रतिमा फेटाळल्या जातात. प्रतिमांच्या आधाराने प्रदाने केली जात असल्याने, त्या प्रतिमांचा दर्जाबाबत खात्री करुन घेणे आवश्यक असते. केवळ आवश्यक/सुयोग्य दर्जाच्या प्रतिमाच सीटीएस प्रक्रिया चक्रात जात असल्याची खात्री करण्यासाठी, कॅपचर सिस्टिमच्या स्तरावर आणि समाशोधन गृहाच्या इंटरफेसवर (सादरकर्या बँकेच्या), दर्जा तपासणीची कडक प्रक्रिया ठेवलेली असते.
ह्याचे उत्तर म्हणजे निरनिराळ्या स्तरांवर प्रतिमा-दर्जा-मूल्यमापन (आयक्युए) करणे : सादरर्कत्या बँकेला ही आयक्युए प्रक्रिया, ती प्रतिमा घेत असतानाच करावी लागते. ह्यापुढील आयक्युए, ती प्रतिमा समाशोधन गृहाकडे पाठविण्यापूर्वीच्या गेटवेवर केले जाते. ह्या प्रतिमा, सादरर्कत्या बँकेच्या डिजिटल सहीसह घेतल्या जातात व त्यानंतर, त्या समाशोधन गृहांमार्फत प्रदानर्कत्या बँकांना पाठविल्या जातात. ह्याशिवाय, प्रतिमेच्या दर्जाबाबत किंवा अन्य कारणाने प्रदानर्कत्या बँकांचे समाधान न झाल्यास, त्या बँका, त्या संलेखाचे प्रदान करण्यापूर्वी प्रत्यक्ष संलेखाची मागणी करु शकतात.
ह्याशिवाय, सीटीएस 2010 हे मानक, चेक्सवर काही अनिवार्य व ऐच्छिक लक्षणे असणे विहित करते आणि ह्या प्रतिमांची एकमेवता वाढते.
(13) भारताचा संदर्भात सीटीएसमध्ये प्रतिमांचे कोणते निकष आहेत ?
चेक्सच्या प्रतिमा घेणे निरनिराळ्या तंत्रज्ञान पर्यायांवर आधारित असू शकते. ह्या प्रतिमा काळ्या-पांढ-या, ग्रे-स्केल किंवा रंगीत असू शकतात. ह्यांचे अंगभूत फायदे व तोटेही आहेत. प्रतिमेच्या आकाराच्या संदर्भात, काळ्या-पांढ-या प्रतिमा फिकट/अस्पष्ट असतात, आणि त्या चेक्स मधील सूक्ष्म अशी सर्व लक्षणे प्रकट करत नाहीत. रंगीत प्रतिमा आदर्श आहेत, पण त्यामुळे साठवणक्षमता व नेटवर्कची बँडविडथ आवश्यकता वाढतात. ग्रे-स्केल प्रतिमा ह्या मध्यम आहेत. भारतामधील सीटीएसमध्ये, ग्रे-स्केल व काळ्या-पांढ-या प्रतिमांचा संयोग वापरला जातो. प्रत्येक चेकच्या तीन प्रतिमा घ्याव्या लागतात ग्रे-स्केल, पुढच्या बाजूची काळी-पांढरी आणि मागील बाजूची काळी-पांढरी.
(14) चेक्सच्या प्रतिमा कशा घेतल्या जातात ?
विशिष्ट प्रकारचे स्कॅनर्स वापरुन चेक्सच्या प्रतिमा घेतल्या जातात. दस्त/कागदपत्रावर, एका अरुंद फटीमधून पाडलेल्या प्रकाशाचे परावर्तन करुन, फोटो-कॉपियर्स प्रमाणेच स्कॅनर्स काम करतात. ह्या प्रकाश शलाकेवरील प्रत्येक बिंदुवरुन होणारे परावर्तन, छोट्या संवेदकांद्वारे मोजले जाते. प्रत्येक बिंदु (डॉट) च्या रिफ्लेक्शन्स मापनांना पिक्सेल्स असे म्हटले जाते. ह्या पिक्सेल्सचे डिजिटल मूल्यामध्ये रुपांतरण केले जाण्याच्या प्रकारावर आधारित, प्रतिमांचे, काळी-पांढरी, ग्रे-स्केल किंवा रंगीत असे वर्गीकरण केले जाते. ग्रे-स्केल प्रतिमा मिळविण्यासाठी, काळा व पांढरा ह्या रंगांच्या दरम्यान, ग्रे (करड्या) रंग छटांच्या व्याप्तीमध्ये पिक्सेल्स ठेवले जातात. मूळ दस्त ऐवजाची संपूर्ण प्रतिमा, मूळ स्त्रोताच्या रंगावर अवलंबून ग्रे रंग छटांमध्ये (कमी अधिक फिकट किंवा गडद) तयार केली जाते. काळ्या-पांढ-या प्रतिमेच्या बाबतीत, विरोधाभासाच्या (काँट्रास्ट) मूल्याच्या व्याप्तीवर आधारित केवळ दोन रंगातच प्रतिमा तयार केली जाते. काळ्या-पांढ-या प्रतिमेला बायनरी इमेज असेही म्हणतात.
(15) नेटवर्कमधून पारेषित केलेली प्रतिमा व माहिती कशी सुरक्षित ठेवली जाते ?
सादरर्कत्या बँकेने समाशोधन गृहामार्फत, प्रदानर्कत्या बँकेकडे पाठविलेल्या माहितीची व प्रतिमेची सुरक्षा, एकात्मता, नाकारली न जाणे व सत्यता ह्या बाबतची खात्री, पब्लिक की इन्फ्रास्ट्रक्चरचा (पीकेआय) उपयोग करुन केली जाते. आयटी अधिनियम 2000 च्या आवश्यकतांचे, सीटीएस अनुपालन करते. प्रारंभ बिंदुपासूनच प्रतिमा व डेटा ह्यावर सही करणे, सादरर्कत्या बँकांसाठी अनिवार्य करण्यात आले आहे. कॅपचर सिस्टिम, सादरकर्ती बँक, समाशोधन गृह आणि प्रदान करणारी बँक अशा संपूर्ण चक्रामध्ये पीकेआयचा उपयोग केला जातो. वापरण्यात आलेली पीकेआय मानके, सुयोग्य भारतीय कायदे व कंट्रोलर ऑफ सर्टिफायिंग ऑथोरिटी (सीसीए) च्या अधिसूचना ह्यांच्या अनुसार आहेत.
(16) चेक प्रमाणभूतीकरणा (स्टँडर्डायझेशन) म्हणजे काय व सीटीएस 2010 मानक काय आहे ?
चेकच्या पानांचा (फॉर्म) आकार, एमआयसीआर बँड, कागदाचा दर्जा इत्यादी बाबींबाबत प्रमाणभूतीकरण करणे हा, चेक प्रक्रिया यांत्रिक करण्याबाबतचा एक महत्वाचा घटक होता. काही काळानंतर, सेगमेंटेशन ब्रँडिंग, आयडेंटिफिकेशन इत्यादी मध्ये मदत होण्यासाठी, बँकांनी, ह्या चेकच्या फॉर्ममध्ये अनेक नमुने (पॅटर्न), डिझाईन तर टाकलीच, आणि त्याचबरोबर, त्या चेक्सचा गैरवापर, खोडखाड, बदल केला जाऊ नये ह्यासाठी त्यात अनेक सुरक्षा लक्षणेही टाकली. एखाद्या बँकेच्या शाखेमधील चेक हाताळण्यासाठी बहु-शहरीय व दर्शनी मूल्यावर प्रदान असलेल्या चेक्सचा वाढता वापर, चेक ट्रंकेटिंग प्रणाली (सीटीएस) ची सुरुवात, स्पीड क्लियरिंगची वाढती लोकप्रियता इत्यादी मुद्दे, बँकिंग व्यवसायात, बँका व ग्राहक ह्यांच्याद्वारे एकसमानतेने हाताळल्या जाणा-या व छापलेल्या आणि देण्यात आलेल्या चेक्समध्ये काही सामान्य व किमान सुरक्षा लक्षणे विहित करण्यास कारणीभूत झाले.
त्यानुसार, देशभरातील बँकांद्वारे दिलेल्या चेक्सबाबत प्रमाणभूतीकरण साध्य करण्यासाठी काही निकष (बेंचमार्क) विहित करण्यात आले. जसे कागदाचा दर्जा, वॉटरमार्क, अदृष्य शाईमधील बँकेचा लोगो, व्हॉईड पँटोग्राफ इत्यादि व चेक्सवरील फील्ड्स प्लेसमेंटचे प्रमाणभूतीकरण. ह्याशिवाय, बँकांच्या गरजा व दृश्यमान जोखीम ह्यावर आधारित, बँकांनी काही स्पृहणीय लक्षणेही टाकण्याची सूचना केली आहे.
देशभरातील बँकांनी दिलेल्या चेक फॉर्म्सवर किमान सुरक्षा लक्षणांचा एक संच ठेवला गेल्यास अशा सर्व चेक्समध्ये एकसमानता तर येईलच, पण त्याचबरोबर, प्रतिमा आधारित प्रक्रियेमध्ये, प्रदानर्कत्या बँकांचे चेक्सची छाननी/ओळख करतानाही सादरर्कत्या बँकांना मदत होईल. सुरक्षा लक्षणांमधील एकसमानतेमुळे चेक्सच्या फसवणुकी कमी होणे अपेक्षित आहे, तर चेक्सच्या फॉर्मवरील फील्ड प्लेसमेंटसमधील एकसमानतेमुळे, ऑप्टिकल/इमेज कॅरॅक्टर रेकग्निशन तंत्रज्ञानाचा वापर करुन सरळसोट (स्ट्रेट थ्रु) प्रक्रिया केली जाण्यास मदत होईल. ह्या बेंचमार्क प्रिस्क्रिप्शन्सना एकत्रितपणे सीटीएस-2010 मानक म्हटले जाते.
आपल्या ग्राहकांना चेक सुविधा देण्याच्या सर्व बँकांना, केवळ सीटीएस-2010 मानकाचे चेक्सच देण्यास सांगण्यात आले आहे. ह्या सीटीएस-2010 मानकानुसार नसलेल्या चेक्सचे समाशोधन, नोव्हेंबर 1, 2014 पासून कमी वारंवारतेने (आठवड्यातून एकदा) केले जाईल.
(17) चेक फॉर्म्सवर बदल/खोडाखोड ह्यावर काय उपाय आहेत ?
चेक संबंधाने होणा-या फसवणुकी कमी करण्यासाठी, चेक्सवर खोडाखाड/बदल, सुधारणा करण्याबाबतच्या सूचना विहित करण्यात आल्या आहेत. चेक्सवर कोणतीही खोडाखाड/बदल (आवश्यक तेथे योग्य तारीख टाकणे सोडून) करता येणार नाही. प्राप्त कर्जाचे नाव, कर्टसी अमाऊंट (रक्कम अंकात) किंवा लिगल अमाऊंट (रक्कम अक्षरात) ह्यामध्ये बदल करावयाचा असल्यास ग्राहकांनी नवीन चेक फॉर्म वापरावा. ह्यामुळे बँकांना खोटेपणाने केलेले बदल ओळखण्यास व ते नियंत्रित करण्यास मदत होईल. ही मनाई, केवळ प्रतिमा आधारित चेक ट्रंकेशन सिस्टिम (सीटीएस) खाली समाशोधित चेक्ससाठीच लागु आहे. संलेखांची प्रत्यक्ष अदलाबदल करुन केलेल्या समाशोधनाला ती लागु नाही.
(18) फसवणुकी टाळण्यासाठी बँकांनी/ग्राहकांनी कोणती सावधगिरी घेणे आवश्यक आहे ?
बँकांनी/ग्राहकांनी केवळ सीटीएस-2010 मानकाचेच चेक्स वापरावेत. ते केवळ प्रतिमा-स्नेहीच नाहीत तर त्यात अधिक सुरक्षा लक्षणे असतात. ग्राहकांनीही त्यांच्या बँकांना, सीटीएस-2010 मानकानुसार असलेले चेक फॉर्म्स देण्याची विनंती/आग्रह करावा. ग्राहकांनी चेक लिहिताना शक्यतो प्रतिमा-स्नेही रंगाची शाई वापरावी आणि चेकवर खोडाखाड/बदल करु नयेत. तो चेक प्रतिमा आधारित समाशोधन प्रणालीमार्फतच समाशोधित केला जाण्याची शक्यता असल्याने, काही खोडाखाड/बदल करावयाचा असल्यास, नवीन चेक वापरावा.
चेक फॉर्म्सवर शिक्के मारताना बँकांनी काळजी घ्यावी की जेणेकरुन, तारीख, प्राप्तर्कत्याचे नाव, रक्कम व सही ह्यासारख्या महत्वाच्या भागांना धक्का लागणार नाही. रबर स्टँप मारल्यामुळे ह्या मूलभूत गोष्टींची सुस्पष्टता चेकच्या प्रतिमेमध्ये झाकली जाऊ नये. स्कॅनिंगच्या प्रक्रियेमध्ये, चेकचे सर्व आवश्यक घटक त्याची प्रतिमेमध्ये स्पष्टपणे येतील ह्याची खात्री करणे आवश्यक असून बँकांनी/ग्राहकांनी ह्याबाबत सुयोग्य काळजी घेणे आवश्यक आहे. |